सोमवार, १३ जानेवारी, २०१४

पितात सारे गोड हिवाळा...

​​आजकाल नुसतं 'थंडी' म्हटलं तरी कुडकुडायला होतंय. खरचं, अहो चक्क मुंबईत थंडी पडलीय. त्यामुळे माझ्यातलं आणि अंथरुणात नातं सकाळी जरा जास्तच घट्ट व्हायला लागलंय. अचानक ही गुरुत्त्वाकर्षणीय शक्ती अभूतपूर्वरित्या कार्य करू लागते आणि मग अंथरुणात आरामात झोपण्यापेक्षा नुसतं लोळत पडणं हे जास्त सुखदायक असतं हे परत पटतं. म्हणून कुंभकर्णाने कदाचित असे वरदान मागितले असावे. :)

पूर्वी थंडी ही केवळ मुंबईतही ३ ऋतू असतात म्हणून किंवा मर्ढेकरांच्या 'पितात सारे गोड हिवाळा' ह्या कवितेतच होती. रात्री तर देवाने त्याचा A.C. १६ वर ठेवला असावा असा भास होण्याइतपत थंडी वाजते. ठीकयं पण, चालायचंच. दिस जातील दिस येतील. तोपर्यंत कविवर्य मर्ढेकरांच्या खालील कवितेचा आस्वाद घेत हिवाळा पिऊया तर…

पितात सारे गोड हिवाळा ( कवी - बा. सी. मर्ढेकर )

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा