बुधवार, २८ मार्च, २०१८

राम ते 'श्री'राम...एक प्रवास

मानवत्वापासून ते देवत्वापर्यंतचा विस्मयकारी प्रवास म्हणजे रामायण. 'राम' ते 'श्रीराम' होण्याचा प्रवास. 'नर' ते 'नारायण' होण्याचा प्रवास. मानवी जीवनाला असणाऱ्या मर्यादेच्या सर्व चौकटी सांभाळत जीवनाला सर्वोच्च पातळीवर नेत अद्भुत आदर्शाचा परिपाठ श्रीरामांनी आपल्यासाठी घालून दिला आहे.

'गदिमा' या देवदूताचे अनंत असे उपकार आपल्यावर. रामायणातील अनेकाविध पैलू गीत रुपात त्यांनी असे काही मांडलेत की आपल्याला 'धन्य मी मानव गदिमा, ऐकिले गीतरुपी रामायणा' असं म्हणावसं वाटतं. उपमा, कल्पनाविलास, शब्दांची निवड आणि यमक इतकं चपखल की स्वतः ज्ञानदेवांनी 'वा' म्हणावं. आणि इतक्या दिव्य शब्दांना स्वर्गीय साज चढवून स्वरबद्ध करणारे बाबूजी म्हणजे जणू पंढरीचा कळस. वारीला जाणाऱ्या सर्वांनाच पंढरीनाथ भेटतोच, दिसतोच असं नाही पण कळस दिसला तरी समाधान वाटते. तसंच गदिमांचे शब्द, त्यांचे गर्भीतार्थ मतीतार्थात उतरले नाहीत तरी बाबूजींचे अमृतरुपी संगीत मनाला सुखाने चिंब करून जाते.

श्रीराम देव होते, त्यांना सर्व सहजशक्य होते असे वाटणाऱ्यांसाठी श्रीराम मानवी आयुष्यचं कसे जगले यावर उजळ प्रकाश टाकणाऱ्या ओळीं गदिमांच्या लेखणीतून अवतरल्या आहेत.

आश्रमाजवळ एक सुंदर असा अभूतपूर्व सुवर्णमृग पाहून 'तोडीता फुलें मी सहज पाहिला जातां, मज आणुनि द्या तो हरिण अयोध्यानाथा' असा लडिवाळ हट्ट मैथिलीने धरला तेव्हा तिच्यातील स्त्रीसुलभ वर्तन दिसून येते. जन्मजात असलेले सौंदर्य वाढवण्यासाठी इतर प्रसाधनाचा वापर करणे, राजवैभवाचा त्याग करून अरण्यात येताना काहीच न वाटणे पण एकाच सुवर्णमृगावर भाळून त्याचा मोह उत्पन्न होणे हे स्वभावातील गुणदोष अतिशय सजीवपणे गदिमा समोर आणतात. आपल्या पत्नीच्या इच्छेसाठी श्रीराम त्या सुवर्णमृगामागे जातात आणि परत आल्यावर सीता आश्रमात नाही हे पाहून अत्यंत व्यथित होतात. वृक्षवेली, पानाफुलांना सीता कुठे आहे हे विचारू लागतात आणि शेवटी 'काय भोगणें आता उरलें, चार दिसांचें चरित्र सरलें, हे दुःखाचें सागर भरलें, यांत जाऊं दे राम वाहुनी' असं म्हणून दुःखविलाप करू लागतात. आपली प्रिय व्यक्ती दिसेनाशी झाल्यावर निघणारी ही शोकाकुल प्रतिक्रिया अगदी सहज आहे.

दुसऱ्या एका प्रसंगी रावणासोबत निर्णायक युद्ध करताना श्रीराम रावणाचे शीर्ष उडवून लावतात. रावणाचे एक शीर्ष तोडल्यावर लगेच तिथे दुसरे शीर्ष उपजते. असे शंभरवेळा घडते तेव्हा हा चमत्कारिक प्रकार पाहून श्रीराम गोंधळतात आणि अत्यंत चिंतीत स्वरात सारथी मातलीला विचारतात,

आज कां निष्फळ होती बाण?
पुण्य सरें की सरलें माझ्या बाहूंमधले त्राण?

घडलेला प्रकार हा बुद्धीला चक्रावणारा होता, निराश करणारा होता, हताश करणारा होता. रामांच्या समोर रामरिपूंचे प्राण वाचणे मुळीच शक्य नसताना रक्ताने न्हालेला रावण जिवंत कसा? रावणांग तोडले असता दुसरे शीर्ष असे उपजते जसे का ही कुणा सजीव शिरांची खाणच आहे. ज्या शरांनी खर, दूषण, मारिच, वाली क्षणांत गतप्राण झाले, ज्या शरांच्या भीतीपोटी स्वतः सागर मागे हटला त्या पराक्रमी माझ्या अक्षय्य भात्यात आज विजय देणाऱ्या शरांची वाण पडावी, काय हे दुर्दैव? असे नानाविध विचार श्रीरामांच्या मनात आले. रावणाला जिवंत पाहून त्यांना आपल्या धनुर्विद्येचा अपमान असह्य झाला. इतकेच नव्हे तर आपले लंकेस येणे व्यर्थ तर झालें नाही ना असा विचारदेखील त्यांच्या मनात चमकून गेला. वैचारिक द्वंद्वाने मनात थैमान घातले.

हा मनुष्य स्वभाव नव्हे तर दुसरे काय आहे? राग, लोभ, भय, मोह, द्वेष, मत्सर इत्यादी सर्व गुणांनी युक्त जगात मानवाप्रमाणे आयुष्य व्यतीत करून 'पुरुषोत्तम' बनणारे श्रीराम 'एकमेवोद्वितीय' आहेत. मानवाचे आयुष्य जगून, सुखदुःखे भोगत स्वयंशासित लोकराज्य आणणारे आदर्श नृप श्रीराम आहेत. त्यांच्या नावापुढे लागणारा 'श्री' बराच गूढ आहे. तो ठळक उठून दिसतो पण त्यामागचे अखंड तप मात्र अजूनही झाकोळले जातेय. मानवतेकडून देवत्वाकडचा तो प्रवास आहे. 'असे जगलास तर तू देखील देव होऊ शकशील' हा विश्वास देणारा हा प्रवास आहे. वाल्मीकीरुपी ज्योतीने गायलेली रामरूपी तेजाची आरती आहे. अतिशय प्रेरणादायी, हृदयव्यापक आणि आयुष्याच्या कोणत्याही परिस्थितीत आधार देणारे रघुकुलटिळक श्रीरामचंद्र आपल्यावर असेच कृपाशीर्वाद धरून असों हीच प्रार्थना.

शेवटी मारुतीरायाप्रमाणे एकच मागणे मागवेसे वाटते,
"प्रभो, मज एकच वर द्यावा,
या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा"