बुधवार, २४ जुलै, २०१३

वन फॉर द अँड्रॉइड!

अँड्रॉइड मोबाइल घेण्याचे मुख्य कारण म्हणजे छंदांची होणारी पूर्तता. थोडक्यात काय, खेळायला मिळणारे अप्रतिम गेम्स, बहुपयोगी अॅप्सची आणि तेही फुकट. आता ह्या कारणांमध्ये आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे 'पुस्तके'.

पुस्तके वाचणे हा माझा आवडता छंद. गुगल प्लेवर वाचण्यासारखी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. साहित्य चिंतन हे अशी पुस्तके पुरवण्यात आघाडीवर आहेत. गुगल प्लेवर 'साहित्य चिंतन' असा सर्च केल्यास ही पुस्तके डाउनलोड करता येतील.

त्यातल्यात्यात सानेगुरुजींची पुस्तके निव्वळ अप्रतिम, सुरेख. संस्कार कशाशी खातात हे माहिती नसणाऱ्या पालकांना आणि अँड्रॉइडवर केवळ गेम्स खेळणाऱ्या आणि Whatsapp करणाऱ्या पाल्यांना काही चांगले गुण गोष्टींच्या आधारे सानेगुरुजी सहज शिकवतात. सानेगुरुजींची काही पुस्तके मी वाचली, अर्थात मोबाइलवर. अत्यंत सकारात्मक, गोड, सहज, साधी, सोपी वाक्यरचना आणि अंगात भिनतील असे संस्कार हे प्रत्येक गोष्टीचं वैशिष्टय.

मी वाचलेल्या सानेगुरुजींच्या काही पुस्तकांची नावे लिंक सकट देत आहे. त्याने डाउनलोड करायला मदत होईल.
या शिवाय २ भयकथा आहेत ज्या वाचताना खरोखर घाबरायला होतं.


मेंदीच्या पानावर ही अनिकेत समुद्र यांनी लिहिलेली लव्ह स्टोरी देखील वाचण्यासारखी आहे.

तर चला मग उचला मोबाइल आणि सुरु करा डाउनलोडिंग…

गुरुवार, ४ जुलै, २०१३

पहिला ब्लॉग, पहिली पोस्ट...

बरेच दिवस झाले होते ब्लॉग बनवून. वाट पाहत होतो कधी वेळ मिळेल आणि काय पोस्ट करायचे तेही सुचत नव्हते. बाकी पुणेरी म्हणजे पुण्याचे लोकं (हा टोमणा नाही तरी क्षमस्व!) मस्तच ब्लॉग लिहितात. अगदी आवर्जून वाचण्याजोगे.

अजून ही काही नक्की नाही तरी काही प्रसिद्ध आणि मला आवडलेल्या कविता पोस्ट करणार आहे. (अशा वेळी कॉपी + पेस्ट हे सगळ्यात मोठे वरदान वाटते.)

तरी पुढील वेळी लंप्या विषयी लिहिण्याचा मानस आहे. ऑनलाईन वाचा-वाची करताना मनालीच्या आणि रश्मीच्या ब्लॉग वर लंप्याची ओळख झाली. वनवास विषयी कळालं. थोडा शोध घेतला तर लक्षात आलं की ही तर पुस्तकांची सीरिज आहे.

                                              'वनवास', 'पंखा', 'झुंबर', 'शारदा संगीत'


मग काय Flipkart ला सांगितलं, पुस्तकं घरी आली. आईसाहेबांच्या भुवया वर झाल्या. आधी घेतलेली पुस्तकं तर वाच आणि मग नवीन घे वगैरे सल्ले दिले गेले, पण काय करु जुनी सवय (खोड) आहे संग्रह करण्याची. तर असो.

लंप्याचा 'बेष्ट' असा 'मॅड'नेस, त्याचे 'मॅड' मित्र आणि खऱ्या त्या २ गोष्टी ज्यांसाठी ही पुस्तके घेतली ती म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील लळा लावणारी कानडी वळणाची गोड मराठी आणि मलपृष्ठावरील पुलं चे मनोगत! हे सगळं म्हणजे अगदी परब्रम्ह प्राप्त झाल्यासारखं वाटतं आहे.


“लंप्याच्या भाषेत सांगायच म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा ‘ मॅड सारख्या वाचल्या’ तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चट्कन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे…..”- इति पुल.